माझा परिचय

नमस्कार, मी माधुरी सतिश मिसाळ. गेल्या 17 वर्ष पर्वती विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे लोकनियुक्त आमदार म्हणून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून कार्यरत आहे.

2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या मतदारांनी चौथ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवत मला भरघोस मतांनी विजयी केले. आणि तोच विश्वास पक्षाने दाखवून माझ्या खांद्यावर विविध खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. आज माझ्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून मी आपणाशी मनमोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे.

तसं बघायला गेलं तर जनसेवेचा हा वारसा या वीस वर्षापुरता मर्यादित नाही एवढं नक्की. माझे आजोबा स्वर्गीय केशवराव देशपांडे सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सर्व परिचित होते. जुलमी इंग्रज राजवटीविरुद्ध त्यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा दिला. त्यांच्याकडूनच देशप्रेम आणि समर्पणाचा वारसा मला लाभला आहे. माझे पती कै. सतिश धोंडीबा मिसाळ यांनी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. त्यांनीच राजकारण आणि समाजकारणात आपण दिलेल्या मार्गावर आम्ही आजही चालतो आहोत.

तत्पूर्वी मी वाणिज्य विभागातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. 2007 साली भारतीय जनता पार्टीतर्फे पहिल्यांदा महानगरपालिका निवडणूक लढवून मी मंडई परिसरातून पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर 2009 साली पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मला पक्षाने दिली.

पुढे महाराष्ट्र विधानसभा प्रतोद, महाराष्ट्र राज्य लोक लेखा समितीची सदस्य, महाराष्ट्र राज्य सामाजिक उपक्रम समितीची सदस्य, पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या पक्षातर्फे माझ्यावर सोपविल्या गेल्या, ज्यांना मी माझ्या परीने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला.

यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी सतिश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानचे तसेच ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे, विद्या सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. सोबतच उद्यम सहकारी बँकेची संचालिका तसेच शिक्षण प्रसारक मंडळीची संचालिका म्हणूनही मी यशस्वीरित्या माझी कर्तव्ये पूर्ण केली आहेत.

पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना 2017 साली पुणे महानगरपालिकेची सत्ता यावी यासाठी केलेल्या प्रयत्नांना पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.माझ्या पर्वती मतदारसंघात जेव्हा पहिल्यांदा मी आमदार झाले तेव्हा भारतीय जनता पार्टीचे तीन नगरसेवक होते. आज 2026 रोजी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत ती संख्या 25 नगरसेवकांपर्यंत पोहोचलेली आहे. हेच माझे संघटनात्मक यश आहे असे मी मानते.

आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री विकास पुरुष श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पर्वती मतदारसंघातील आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून काम करताना केंद्रातून वाहत येणारी विकासाची गंगा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून मी सतत प्रयत्नशील असते आणि राहीन.

Scroll to Top